शहर हरित करण्यासाठी पर्यावरण वाहिनीच्या महत्त्वपूर्ण सूचना: नगरपरिषदेला निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील पर्यावरण विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करत पर्यावरण वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी बल्लारपूर नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर केले.
पर्यावरण वाहिनीच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, नगरपरिषद अध्यक्षा डॉ. अलका वाढई आणि उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांची भेट घेऊन शहरातील पर्यावरणविषयक विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
निवेदनात शहरात मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्याची मोहीम राबविणे, प्लास्टिक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करून तो ठरावीक दिवशी जमा करण्याची व्यवस्था सुरू करणे, तसेच या उपक्रमासाठी व्यापारी संघटना व उद्योजकांचे सहकार्य घेण्याची मागणी करण्यात आली. नवीन इमारतींच्या बांधकामावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि परिसरात आवश्यक प्रमाणात वृक्षलागवड बंधनकारक करण्याची सूचनाही करण्यात आली.
याशिवाय सिमेंट रस्त्यांच्या आराखड्यात भविष्यातील वृक्षलागवडीसाठी जागा राखीव ठेवणे, नागरिकांना मागणीनुसार वृक्षांची रोपे उपलब्ध करून देणे, शहरातील पाणी साचणाऱ्या उतार भागात शोषखड्डे तयार करणे, तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानातील प्लास्टिक कचरा स्वतंत्र पिशवीत साठवून वेगळ्या डब्यात ठेवावा, जेणेकरून तो नाल्यांमध्ये जाणार नाही,यासाठी व्यापक जनजागृती करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, अध्यक्षा डॉ. अलका वाढई आणि उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी पर्यावरण वाहिनीने मांडलेल्या मागण्यांची दखल घेत काही समस्या तत्काळ निकाली काढल्याचे सांगितले. उर्वरित मागण्यांवरही लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ, सचिव मनोहर माडेकर, मनोज वानखेडे, वाजिद खान, सुधीर कोरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




