भरधाव पिकअपच्या धडकेत तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू : चालक फरार, ग्रामस्थांचे पहाटेपर्यंत रास्ता रोको आंदोलन


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील दासगाव येथे आठवडी बाजाराच्या गर्दीत भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू पिकअपने तीन वर्षीय चिमुकलीला दिलेल्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १४ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात बलमाटोला येथील रहिवासी पासी लक्ष्मीचंद सेवईवार ३ वर्ष हिचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बलमाटोला येथील लक्ष्मीचंद सेवईवार हे आपल्या तीन वर्षीय मुलगी पासी हिच्यासोबत दासगाव येथील आठवडी बाजारासाठी आले होते. बाजारात मोठी गर्दी असताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मालवाहू पिकअपने बाप-लेकीला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने वाहनासह काटी मार्गाने पलायन केले.
अपघातात लक्ष्मीचंद सेवईवार आणि त्यांची मुलगी पासी गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी तत्काळ मदत करून दोघांनाही दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चिमुकली पासी हिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रावणवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, आरोपी चालक आणि वाहनाचा तातडीने शोध घेण्याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले.
चिमुकलीचा मृतदेह हातात घेऊन वडिलांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिस हाय हाय अशा घोषणा देत आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. हे आंदोलन पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र तुरकर यांनीही घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबीयांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, रावणवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी चालकाला एका दिवसात अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिस वाहनाने गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांवर बंदीची मागणी -
दासगाव येथील बाजाराच्या दिवशी मोठ्या वाहनांची वर्दळ वाढत असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बाजाराच्या दिवशी अवजड व मालवाहू वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे केली होती.
दोन महिन्यांत तीन अपघात -
दासगाव येथील याच ठिकाणी गेल्या दोन महिन्यांत तीन अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रस्त्यावरील सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले ब्रेकर काही अज्ञातांनी काढून टाकले. ब्रेकर कायम असते तर अपघात टाळता आला असता, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.या घटनेमुळे दासगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फरार पिकअप चालकाला तातडीने अटक करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययो
News - Gondia




Petrol Price




