सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय : आजाद समाज पार्टीकडून चौकशी व कारवाईची मागणी


- सहा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; दोघांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात पिण्याच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत सहा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी शाळेतील पिण्याचे पाणी प्यायल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, चक्कर येणे आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एकूण सहा विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती तुलनेने गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार आणि जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड यांनी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड आणि युवा जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची भेट घेतली. त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती राज बन्सोड यांनी दिली.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी, शाळेत पाणी पिल्यानंतर अचानक डोके दुखू लागले, चक्कर आली आणि आम्ही खाली पडलो, अशी माहिती दिल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेबाबत आजाद समाज पार्टीने गंभीर चिंता व्यक्त केली असून, संबंधित शैक्षणिक संस्थेच्या परिसरातील स्वच्छतेचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.
याशिवाय जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधित महाविद्यालयावर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांची विशेष तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे आजाद समाज पार्टीने म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत अहवाल अद्याप समोर आलेला नसून, चौकशीनंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




