थायलंडमधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बौद्ध भिक्षूंना वाहिली श्रद्धांजली


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : थायलंडमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नऊ बौद्ध भिक्षूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बल्लारपूर येथील पाली बुद्ध विहार परिसरात वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जुलै रोजी सायंकाळी सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर थायलंडमधील अपघातात दिवंगत झालेल्या नऊ बौद्ध भिक्षूंना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात या दुर्दैवी घटनेमुळे बौद्ध धम्माची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. दिवंगत भिक्षूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. त्रिशरण, पंचशील आणि सुत्तपठण करून सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखा पागडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रमण पुणेकर, महिला शहराध्यक्षा गायत्री रामटेके, वंचित युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, शहर महासचिव गौतम रामटेके, बेघर जनकल्याण सोसायटीचे सचिव देवराम नंदेश्वर यांच्यासह रत्नमाला निरांजणे, संगीता साखरे, प्रियंकेश शिंगाडे, मून साहेब, वत्सला तेलंग, शालिनी वावरे, रेखा मेश्राम, प्रज्ञा नमनकर, संगीता वनकर, शालू चांदेकर, आशा भाले, वनमाला भसारकर, ममता कुंभारे, नंदा देशभ्रतार, मंगला झाडे, जया भंडारे, अल्का अलोने, प्रेमिला लभाने, किरण रामटेके यांच्यासह बहुसंख्य बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
उपस्थितांनी दिवंगत भिक्षूंच्या कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच जगात शांतता, करुणा आणि मैत्रीचा संदेश अधिक दृढ व्हावा, अशी प्रार्थना व्यक्त केली.
News - Chandrapur




Petrol Price




