शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट द्या : गडचिरोलीत १,०३३ शाळा बंद


विदर्भ न्यु एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मधून शिक्षकांना कायमस्वरूपी सूट द्यावी आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ९ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या शाळाबंद आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषदेच्या १,४३२ शाळांपैकी तब्बल १,०३३ शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. सुमारे २,५९५ शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था एका दिवसासाठी ठप्प झाली. विविध शिक्षक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र, शहरात लागू असलेल्या जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यानंतर शिक्षकांनी शांततेने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी योगेश ढोरे, गौतम लांडगे, रघुनाथ भांडेकर, चक्रपाणी कन्नाके, खिरेंद्र बांबाळे, रमेश रामटेके, राजेश चिलमवार, राजेश बाळराजे, प्रभाकर गडपायले, डंबाजी पेंदाम, आकाश चांदेकर, बापू मुनघाटे, पुंडलिक देशमुख यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




