जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे जामगिरी शाळेत बालसुरक्षेबाबत जनजागृती


- १४३ विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जामगिरी येथे बाल संरक्षण विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील १४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बालहक्क, बालसुरक्षा आणि बालविवाह प्रतिबंध याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी सामूहिक बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाइत आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जुलै २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना कायदेशीर संरक्षणाची माहिती देणे आणि सुरक्षित वातावरणाची जाणीव करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, बालसंरक्षण आणि कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहाचे सामाजिक व शारीरिक दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायदा, २०१२ विषयी सोप्या भाषेत माहिती दिली.
विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श यातील फरक समजावून सांगत अशा प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करावे, सतर्कता कशी बाळगावी आणि विश्वासू व्यक्तींकडे मदत कशी मागावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय शासनाच्या विविध बालकल्याण योजनांची माहिती, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपलब्ध असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन सेवेची माहिती, बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व यावरही सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित १४३ विद्यार्थी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी बालविवाहाला विरोध करण्याची व समाजात जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा, बालहक्क आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक आत्राम, शिक्षक विद्यानगर मांदाळे, दीपक पुंगाटी, लालदेव कोडापे तसेच अंगणवाडी सेविका सुनंदा वाढई आणि सुवर्णा गेडाम यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा जनजागृती कार्यक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
News - Gadchiroli




Petrol Price




