महत्वाच्या बातम्या

 सुगंधित प्रतिबंधित तंबाखूची अवैध विक्री उघड : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू बेकायदेशीररित्या साठवून तिची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत ६७ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आले. तोफीक करीम भिमानी ३६ वर्ष नूरी मशिदीजवळ, रहेमतनगर, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखू, अंमली पदार्थ तसेच अन्य अवैध वस्तूंचा साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी दिले होते. या सूचनांनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला गुप्त माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार रामनगर पोलिसांचे शोध पथक परिसरात गुप्त माहिती गोळा करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी तोफीक करीम भिमानी ३६ वर्ष नूरी मशिदीजवळ, रहेमतनगर, चंद्रपूर हा आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला ईगल व क्रेझ या ब्रँडची सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात साठवून तिची विक्री करत आहे.

या माहितीची खातरजमा करून रामनगर पोलिसांच्या पथकाने ८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२५ वाजता पंचांसमक्ष आरोपीच्या घरावर छापा टाकला. छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातून होला ईगल आणि क्रेझ या ब्रँडची महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून एकूण ६७ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित माल जागीच जप्त केला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०५/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३ व २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३०(२)(अ), २६(२)(i), २६(२)(iv) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तोफीक करीम भिमानी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोलीस हवालदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम , बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, पोअं पंकज ठोंबरे, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे आणि ब्युटी साखरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos