महत्वाच्या बातम्या

 नवरगावमध्ये स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसचा जन आक्रोश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : विधिमंडळ गटनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल बोडणे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नवरगाव यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तालुक्यात महावितरणकडून बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचा रोष तीव्र होत असून, शहर काँग्रेस कमिटी नवरगाव यांच्या कडून उप कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, सिंदेवाही यांना सविस्तर निवेदन बुधवार ८ जुलै २०२६ ला देण्यात आले.

उपभोक्त्यांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, त्यानंतर अनेक पटीने वाढीव वीज बिल देणे, सामान्य मीटर उपलब्ध करून न देणे तसेच ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप  करण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरणाच्या ठेकेदारांकडून नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना अथवा लेखी संमती न घेता घरामधील जुने व कार्यरत वीज मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. विद्युत कायदा आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नियमानुसार मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना सूचना देणे व त्यांची सहमती घेणे आवश्यक असताना या नियमाचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला. 

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर शहरात व ग्रामीण भागात अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा तीन ते चार पट जास्त रकमेची वीज बिले मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ एक दोन पंखे आणि काही एलईडी दिवे वापरणाऱ्या घरांनाही आठ ते दहा हजार रुपये पर्यंतचे बिले आली आहेत. दोन ते तीन महिने बंद असलेल्या घरांनाही तीन ते चार हजार रुपयांची बिले मिळाल्याचा दावा शहर काँग्रेस कमिटीने केला आहे. पूर्वी दीड ते दोन हजार रुपये येणारे मासिक वीज बिल आता आठ ते दहा हजार रुपयापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटर मध्ये तांत्रिक दोष किंवा कॅलिब्रेशन मध्ये गंभीर त्रुटी असल्याची शंका व्यक्त केली आहे.

याशिवाय, जुने मीटर खराब झाल्यानंतर नवीन सामान्य मीटर उपलब्ध नसल्याचे सांगून ग्राहकांना केवळ स्मार्ट मीटरच स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी डिजिटल मीटर अनिवार्य केल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असून, सोलर पॅनल असलेल्या घरांनाही मोठ्या रकमेची विजबिले येत असल्याचा मुद्दाही शहर काँग्रेस कमिटीने उपस्थित केला आहे. 

महावितरणाच्या या धोरणामुळे गरीब, शेतमजूर, आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे आर्थिक शोषण होत असून वीज सारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. शहर काँग्रेस कमिटी नवरगाव यांच्या कडून महावितरणाकडे सात प्रमुख मागण्या करण्यात आले.

उपभोक्त्यांच्या संमतीशिवाय बसविण्यात आलेले सर्व स्मार्ट मीटर तातडीने काढून त्यांच्या जागी पूर्वीप्रमाणे जुनेच सामान्य मीटर बसविणे, गेल्या तीन महिन्यातील वाढीव बिलांची विभागीय पथकाकडून निष्पक्ष चौकशी करून दुरुस्ती करणे, ग्राहकांच्या लेखी मागणी शिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविणे, खराब मीटरच्या बदल्यात सामान्य मीटर उपलब्ध करून देणे, स्मार्ट मीटर धारकांची माहिती ग्राहकांना देणे, जुन्या मीटरचे नियमित रीडिंग पुन्हा सुरू करणे तसेच संबंधित दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

या गंभीर प्रश्नावर येत्या काही दिवसांच्या आत समाधानकारक निर्णय न घेतल्यास शहर काँग्रेस कमिटी नवरगाव कडून शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष व संघटनांना सोबत घेऊन महावितनाच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला

यावेळी निवेदन देताना उपाध्यक्ष पंकज उईके, युवक अध्यक्ष पवन जयस्वाल, सचिव आनंद मेश्राम, संघटक सोपान कामडी, माजी अध्यक्ष सुशांत बोडणे, काँग्रेस कार्यकर्ते संजय सोनकुसरे, अनिल बोरकर, विविध कार्यकारी सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद कामडी, सोशल मीडिया प्रमुख शांत बहिरवार, रवी चौके, वामन पराते, दिनकर टिपले, मनोज येसनसुरे, अनिकेत कामडी, राकेश कामडी, मयूर बोडणे, प्रणव चहांदे, सूर्यदीप शंभरकर, नितीन गेडाम, पंकज शेंडे, विशाल पंधरे, रवी शेंद्रे, विजय दिवेवार व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos