सराईत अवैध दारू विक्रेत्याला सहा महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार


- गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सवयीच्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र होणार – पोलीस अधीक्षक एम. रमेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : डचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत अवैध दारू विक्रेता तिलक बाबुलाल उंदीरवाडे रा. खुर्शीपार, ता. कोरची, जि. गडचिरोली याला सहा महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कुरखेडा यांनी ३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हा आदेश जारी केला.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्तींकडून छुप्या मार्गाने अवैध दारू विक्री व वाहतुकीचे प्रकार सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस नोंदीनुसार, तिलक बाबुलाल उंदीरवाडे याच्याविरुद्ध अवैध दारू विक्री, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सन २००९ ते २०२५ या कालावधीत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ तसेच इतर संबंधित कलमान्वये एकूण १२ गुन्हे कोरची पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. वारंवार गुन्हे दाखल होऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कुरखेडा यांच्याकडे सादर केला.
सदर प्रस्तावावर सुनावणी व चौकशी केल्यानंतर संबंधित आरोपीच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निष्पन्न झाले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, वारंवार दाखल झालेले गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम लक्षात घेऊन हाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६ (१)(अ) अन्वये त्याला सहा महिन्यांसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित आरोपीने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
याबाबत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हे पोलीस दलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सवयीच्या गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, अवैध व्यवसाय करणाऱ्या तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तडीपारसह कठोर कायदेशीर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
News - Gadchiroli




Petrol Price




