महत्वाच्या बातम्या

 सलग १५ तास गायनातून १९० गीतांचे सादरीकरण : भारती डुंबेरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील उदयोन्मुख गायिका भारती डुंबेरे यांनी सलग १५ तास अखंड गायन करत तब्बल १९० गीतांचे सादरीकरण करून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय विक्रमाची नोंद केली आहे. त्यांच्या या अनोख्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड समितीने घेत त्यांच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड–२०२६ मध्ये अधिकृत नोंद केली आहे. या यशामुळे बल्लारपूर शहरासह चंद्रपूर जिल्ह्याच्या नावाचा देशभर गौरव झाला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारती डुंबेरे यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी बल्लारपूर येथील गोंडराजे नाट्यगृहात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत सलग १५ तास विविध प्रकारच्या १९० गीतांचे अखंड सादरीकरण केले. या संपूर्ण उपक्रमादरम्यान त्यांनी सातत्य, शिस्त आणि उत्कृष्ट गायनकौशल्याचे दर्शन घडवत उपस्थित रसिकांची मने जिंकली.

या विक्रमाची पडताळणी करून फरिदाबाद येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड समितीने  भारती डुंबेरे यांच्या नावाची अधिकृत नोंद केली. समितीतर्फे त्यांना प्रमाणपत्र, पदक (मेडल), अधिकृत ओळखपत्र तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड–२०२६ या विक्रमवीरांच्या नोंदणीकृत पुस्तकाची प्रत प्रदान करण्यात आली.

भारती डुंबेरे यांच्या या यशामुळे बल्लारपूर शहर आणि चंद्रपूर जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.

संगीतावरील निष्ठा, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर मिळविलेल्या या राष्ट्रीय यशामुळे भारती डुंबेरे या युवा कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos