महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्रासाठी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय गडचिरोलीतच स्थापन करावे


- जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांची आग्रही मागणी; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय गडचिरोली येथे तातडीने स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सोमवारी सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २१८ संलग्न महाविद्यालयांचा शैक्षणिक व प्रशासकीय कारभार या विद्यापीठामार्फत चालविला जात आहे. मात्र, या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी आवश्यक असलेले सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय आजही नागपूर येथे कार्यरत असल्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय कामांसाठी वारंवार नागपूरला जावे लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय, अतिरिक्त आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी संबंधित विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची स्थापना केली आहे. त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असल्याने या विद्यापीठासाठीचे सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयही गडचिरोली येथेच स्थापन करणे न्याय्य व आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गोंडवाना विद्यापीठाशी संबंधित सर्व शैक्षणिक, प्रशासकीय आणि परीक्षा विषयक कामकाज गडचिरोली येथे होत असताना केवळ सहसंचालक कार्यालयाच्या कामासाठी नागपूरला जावे लागत असल्याने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ परिसरात अथवा गडचिरोली शहरात तातडीने सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

शासनाने या न्याय्य मागणीची दखल घेत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संबंधित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक रमेश चौधरी, गटनेते नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे तसेच परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos