आरमोरीत अवैध दारूसाठ्यावर धाड : २६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आरमोरी शहरातील आझाद चौक परिसरातील जिओ टॉवरजवळ पोलिसांनी सोमवारी केलेल्या धाडीत अवैध विदेशी, देशी व हातभट्टी मोहा दारूसह तब्बल २६ लाख २५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलीस निरीक्षक कैलास गवते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी, कर्मचारी व पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान चार वाहनांमधून अवैधरित्या विदेशी दारू, देशी दारू तसेच हातभट्टी मोहा दारूची वाहतूक व साठा केल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी प्रवीण भाऊराव खोब्रागडे (वय ३१, रा. फुले वार्ड, आरमोरी) आणि रुपेश रेखचंद ठवरे (वय २९, रा. आझाद चौक, आरमोरी) यांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल कैलास टेंभुर्णे (रा. इंदिरानगर बर्डी, आरमोरी) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईत विदेशी, देशी व हातभट्टी मोहा दारू असा ६ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा साठा, तसेच तीन चारचाकी व एक दुचाकी वाहन असा १९ लाख ७० हजार रुपयांचा वाहनांसह एकूण २६ लाख २५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ७५(अ), ६५(ई), ९८ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
News - Gadchiroli




Petrol Price




