मद्दिगुडममध्ये नाल्या तुडुंब : स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावरच


- ग्रामपंचायतीचा निधी नेमका कुठे खर्च होतो? ग्रामस्थांचा सवाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) अंतर्गत येणाऱ्या मद्दिगुडम गावात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गावातील अनेक नाल्या गाळ, प्लास्टिक कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नसून डासांची उत्पत्ती वाढली आहे. परिणामी, मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, गावातील बोरवेलजवळील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याच ठिकाणी गावातील महिला दररोज कपडे धुण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात. मात्र, परिसरात साचलेला कचरा व अस्वच्छतेमुळे महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
गावातील अस्वच्छतेचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसत असून, साचलेल्या सांडपाण्यामुळे शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच दुर्गंधी व अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक गावात रुजू होऊन बराच कालावधी उलटला असला तरी अद्याप एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील स्वच्छता, विकासकामे व इतर मूलभूत समस्यांवर चर्चा होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करत असताना, मद्दिगुडममधील सद्यस्थिती पाहता हे अभियान केवळ कागदावरच मर्यादित राहिले आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच ग्रामपंचायतीला मिळणारा निधी नेमका कुठे आणि कशावर खर्च केला जातो, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, नियमित ग्रामसभा घ्याव्यात व गावातील मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




