महत्वाच्या बातम्या

 वर्ध्यातून चोरीस गेलेली मोपेड चंद्रपुरात जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली मोपेड अवघ्या काही दिवसांत शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरला यश आले आहे. या कारवाईत चोरीची मोपेड जप्त करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी गिरड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सुशांत राजेंद्र मडावी (वय २६), रा. तळोधी, ता. नागभीड असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, २७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागीय पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की, गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली एक मोपेड तळोधी (ता. नागभीड) येथे आणण्यात आली आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याच्याकडून एमएच-३४-सीएस-४४८२ क्रमांकाची चोरीची मोपेड जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनाची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाहन चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे.

या प्रकरणी गिरड पोलीस ठाणे, जिल्हा वर्धा येथे अपराध क्रमांक ०१५८/२०२६ अन्वये कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुशांत राजेंद्र मडावी ( २६), रा. तळोधी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर असे आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिरड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे ब्रम्हपुरी उप विभागातील कर्मचाऱ्यांनी केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos