महत्वाच्या बातम्या

 मूल पोलिसांचा नागाळ्यात छापा : प्रतिबंधित हुक्का तंबाखूचा साठा जप्त, आरोपी गजाआड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलिसांनी २७ जून रोजी नागाळा येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित हुक्का तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. कारवाईदरम्यान २५ हजार १७५ रुपये किमतीचा सुमारे १९ किलो वजनाचा तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना नागाळा येथील साजित शब्बीर पठान हा किराणा दुकानाच्या आडून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर २७ जून रोजी पोलिसांनी संबंधित दुकान व घराच्या स्टोअर रूमची झडती घेतली.

झडतीदरम्यान होला हुक्का शिशा नावाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी १९ किलो वजनाचे १९ पॅकेट्स जप्त करून एकूण २५ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी साजित शब्बीर पठान याच्याविरुद्ध मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्याजिय आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, संदीप चौधरी तसेच महिला पोलीस अंमलदार निकिता रासावार यांनी केले.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित तंबाखूच्या संदर्भात पुढील आवश्यक कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए), चंद्रपूर यांना कळविण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos