गोंदिया हादरले : कारंजा शिवारात तरुणाचा चेहरा ठेचून निर्घृण खून : दोन दिवसांतील तिसरी घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात एका महिलेच्या झालेल्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच, मंगळवारी (२३) खुनाच्या आणखी एका थरारक घटनेने गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम कारंजा येथील पतंगा चौक ते पोलीस मुख्यालय बायपास मार्गावरील किसान चौकाजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये एका तरुणाचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अनमोल ऊर्फ शंभू वसंत रंगारी (वय ३५, रा. भद्रुटोला, कारंजा) असे मृत तरुणाचे नाव असून, डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड दगड किंवा धारदार हत्याराने वार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोलने अंगात जीन्स पॅन्ट आणि चेक्सचा शर्ट परिधान केला होता. मात्र, आरोपींनी त्याचा चेहरा इतक्या क्रूरपणे ठेचला होता की, तो पूर्णपणे विद्रूप झाला होता. मृतदेहाची अवस्था पाहून परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळावर नागरिका दिली मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा केटीएस रुग्णालयात पाठवला आहे.
या दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर अनमोलची मोटारसायकल बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यामुळे ही हत्या करणारे व्यक्ती मृताच्या परिचयातील असण्याची दाट शक्यता आहे. आरोपींनी त्याला एखाद्या बहाण्याने या निर्जनस्थळी बोलावून घेऊन त्याचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात जुने वाद, वैयक्तिक शत्रुत्व आणि परिचितांची भूमिका या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. अनमोल हा व्यवसायाने रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) चालक होता, तसेच तो खाजगी वाहनेही चालवायचा. तो विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कमावत्या व्यक्तीचा अशा रीतीने अंत झाल्याने रंगारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोंदिया शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात खून, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. अवघ्या दोन दिवसांतील खुनाची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीसह गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अहेरकर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले असून, तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, तसेच या हत्येचा छडा लवकरच लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
News - Gondia




Petrol Price




