चामोर्शी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात : भामरागड येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटा परिसरात शुक्रवार, १९ जून रोजी सकाळी एक भीषण दुचाकी अपघात घडला असून या अपघातात भामरागड तालुक्यातील जुव्वी येथील एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजू मालु कोरसामी (३०, रा. जुव्वी, ता. भामरागड) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजू कोरसामी हा आपल्या एमएच ३३ एएफ-०१४४ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीवरून आपल्या जुव्वी गावाकडे परत जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या सुमारास कुनघाडा फाट्यापासून पूर्वेकडे १२ किलोमीटर अंतरावर आला असता, त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो जोरात रस्त्यावर कोसळला.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरून खाली पडल्यामुळे संजूच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघात घडताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीअंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
सकाळी-सकाळी घडलेल्या या थरारक अपघातामुळे चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, ऐन विशी-तिशीतील तरुण मुलाचा अपघातात नाहक बळी गेल्याने जुव्वी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, अपघाताची नोंद घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




