महत्वाच्या बातम्या

 पावसात घेतलेल्या लिफ्टचा गैरफायदा : कारचालकाकडून युवतीचा विनयभंग, दारूतस्कर आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुसळधार पावसामुळे मामासोबत दुचाकीवरून घरी परतत असलेल्या १८ वर्षीय युवतीने कारचालकाकडे लिफ्ट मागितली. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत कारचालकाने वाटेत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १ ऑगस्ट रोजी कोरचाटोला–बोटेकसा मार्गावर घडली. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून कोरची पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश श्यामसिंग उईके ४२ वर्षे रा. बिहिटेखुर्द, ता. कोरची  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दारूतस्करीच्या प्रकरणातही आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित १८ वर्षीय युवती ही छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून ती कोरची तालुक्यातील आपल्या मामाच्या घरी धान रोवणीच्या कामासाठी आली होती.

१ ऑगस्ट रोजी धान रोवणीचे काम पूर्ण करून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती मामासोबत दुचाकीवरून घरी निघाली होती. त्याचवेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तिने रस्त्याने जाणाऱ्या आरोपीच्या कारला लिफ्ट मागितली. तिचा मामा दुचाकीवरून कारच्या मागोमाग येत होता.

दरम्यान, कारमध्ये प्रवास सुरू असताना आरोपीने युवतीचा हात पकडून तिचा विनयभंग केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आरोपीला मामाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आरोपीने तिला मामाच्या घरी सोडले आणि तेथून पसार झाला.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडित युवतीने कोरची पोलिस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर फिर्याद दिली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह दारूतस्करीचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos