पहाटे एलसीबीची धाड : सिंदेवाहीत २.८४ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास सिंदेवाही येथे धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे आजाद चौक परिसरात छापा टाकला. आरोपी सागर प्रमोदराव केकरे याच्या ताब्यातील भाड्याच्या खोलीची झडती घेतली असता ईगल तंबाखू, मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू व कालासौना जाफराणी जरदा असा १ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला.
त्यानंतर चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे ईगल, होला व मजा हुक्का शिशा तंबाखू, विमल पान मसाला, स्वीटू गोल्ड सुपारी आणि राजश्री पान मसाला असा १ लाख ३५ हजार ८४५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
दोन्ही ठिकाणांहून मिळून २ लाख ८४ हजार १४५ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. चौकशीत हा माल रोहित शिवनकर, रा. तळोधी बाळापूर याने पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा गणेश मोहूर्ले, जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश भोयर, चेतन गज्जलवार, पोअं सुमित बरडे, अजित शेंडे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




