महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर मध्ये सट्टापट्टी जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील बामणी-बल्लारशाह हायवे रोडलगत सुरू असलेल्या अवैध सट्टापट्टी जुगारावर बल्लारशाह पोलिसांनी धडक कारवाई करत एका जुगार चालकाला रंगेहाथ पकडले असून, मुख्य सूत्रधारासह दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ११ जून रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पथक पेट्रोलिंग व जुगारविरोधी मोहिमेवर असताना माहिती मिळाली की, साईबाबा वार्ड येथील रहिवासी चेतन सत्यनारायण नथाणी (४१) हा बामणी-बल्लारशाह हायवे रोडलगत असलेल्या आपल्या पानठेल्यावर श्रीदेवी डे नावाने सट्टापट्टी जुगार चालवत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी पानठेल्यासमोर काही नागरिकांची गर्दी असून एक व्यक्ती लोकांकडून पैसे व आकडे घेऊन कागदावर नोंद करत असल्याचे आढळून आले. पोलिसांचा सुगावा लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी चेतन नथाणी याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान नथाणी याने सट्टापट्टीची उतारी आपल्या मित्र नितीन निपेन दास (४४), रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर याच्याकडे देत असल्याची कबुली दिली. तसेच तो नितीन दास याच्याच वतीने सट्टापट्टीचा व्यवसाय चालवत असल्याचेही पोलिसांसमोर सांगितल्याची माहिती आहे.

आरोपीच्या झडतीत सट्टापट्टीचे आकडे लिहिलेला कागद, एक बॉलपेन तसेच जुगारासाठी जमा करण्यात आलेली ६५० रुपयांची रोकड असा एकूण ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चेतन सत्यनारायण नथाणी व नितीन निपेन दास यांच्याविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम तसेच कलम ४९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा सत्यवान कोटनाके, पोअं लखन चव्हाण यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos