१५ जून रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांच्या समस्यांचे निवारण व्हावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या महिन्याची महिला लोकशाही दिन सभा सोमवार, १५ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या, तक्रारी आणि अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या दिवशी महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक तक्रारींचे लेखी अर्ज स्वीकारले जातील.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे आणि नियम: अर्जाचे स्वरूप तक्रार अर्ज हा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा असावा. प्रती:अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सादर करावा. अर्जाचा नमुना: महिला लोकशाही दिनाचा विहित नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६, २७ कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे मोफत (नि:शुल्क) उपलब्ध आहे.
अर्जांचा विचार केला जाणार नाही:न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील सर्व पीडित आणि समस्याग्रस्त महिलांनी आपल्या अर्जांसह या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




