महत्वाच्या बातम्या

 पेसा आरोग्य सेवकांची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना भेट : कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरती प्रक्रियेतून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदासाठी निवड झालेल्या पेसा आरोग्य सेवकांनी आमदार डॉ. मिलिंद  नरोटे यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी नागपूर येथील उपसंचालकांशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून उमेदवारांच्या मागणीची दखल घेतली आणि लवकरच शासन सेवेत कायमस्वरूपी नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

सदर उमेदवारांची निवड सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १६ मे २०२४ रोजीच्या जाहिरातीनुसार अंतिम गुणवत्ता यादीतून करण्यात आली होती. मात्र, भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना १० फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, सदर भरतीतील ५० टक्के जागा राखीव ठेवून पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत.

याच अनुषंगाने, मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या पेसा आरोग्य सेवकांनी शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून आपली नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून मानधनही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

यावेळी मयुर विनायक कोडापे, निखिल काशीनाथ उसेंडी, लोकेशकुमार बस्तर मडावी, सुजितकुमार शंभू आतला आणि लंकेश तुलशीराम तुलावी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos