आत्मसमर्पित ५३ माओवाद्यांनी अनुभवले महाराष्ट्र दर्शन : समाज, विकास आणि आधुनिकतेची झाली नव्याने ओळख

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अनेक वर्षे घनदाट जंगलात, सशस्त्र संघर्षाच्या वातावरणात आणि बाह्यजगापासून दूर राहिलेल्या आत्मसमर्पित ५३ माओवाद्यांनी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दर्शन अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून राज्याचा विविधांगी अनुभव घेतला. ही केवळ पर्यटन सहल नसून समाज, इतिहास, संस्कृती, शेती, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची नव्याने ओळख करून देणारा भावनिक व अभ्यासपूर्ण प्रवास ठरला.
गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आणि आत्मसमर्पित माओवाद्यांच्या विनंतीनुसार १२ ते १६ जुलै या कालावधीत या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात ११ वरिष्ठ माजी माओवादी नेत्यांसह एकूण ५३ आत्मसमर्पित माओवाद्यांनी सहभाग घेतला.
ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची ओळख -
सहलीदरम्यान सहभागींच्या महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी आयोजित करण्यात आल्या. यामध्ये हल्दीराम उद्योगसमूह, दीक्षाभूमी, शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर तसेच दौलताबाद किल्ला या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश होता.या भेटींमुळे राज्याचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि औद्योगिक प्रगती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सहभागी माजी माओवाद्यांना मिळाली.
अनेकांनी पहिल्यांदाच पाहिली रेल्वे -
जंगलातील पायवाटांवरच आयुष्य व्यतीत झालेल्या अनेक सहभागींसाठी हा बाहेरील जगाशी झालेला पहिलाच प्रत्यक्ष परिचय होता. विशेष म्हणजे, अनेकांनी आयुष्यात प्रथमच रेल्वेगाडी पाहिली. रेल्वेसमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले कुतूहल, आश्चर्य आणि बालसुलभ आनंद उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांच्या मनाला स्पर्श करून गेला.
समाजाशी नव्याने जोडले गेले नाते -
या दौऱ्यात आत्मसमर्पित माओवादी सामान्य नागरिकांमध्ये मिसळले. विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना गडचिरोली आणि माओवादाबाबत समाजाची बदललेली मानसिकता त्यांना जवळून अनुभवता आली. अनेक वर्षांच्या अलिप्ततेनंतर समाजाशी पुन्हा नाते जोडण्याची आणि बदलत्या वास्तवाला स्वीकारण्याची ही भावनिक सुरुवात असल्याची भावना अनेक सहभागींनी व्यक्त केली.
विकासाचा नवा दृष्टिकोन -
या अभ्यास दौऱ्यात आत्मसमर्पित ज्येष्ठ माओवादी नेते मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू यांचाही समावेश होता. त्यांनी या सहलीचे नेतृत्व केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, समाजाच्या मुख्य प्रवाहात परतल्यानंतर या व्यापक समाजाला समजून घेणे आवश्यक होते. हा प्रवास आमच्यासाठी सामाजिक अध्ययनाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या सहलीमुळे विकासाचा नवा दृष्टिकोन मिळाला.ते पुढे म्हणाले की, सशस्त्र चळवळीत असताना बाह्यजगातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांची माहिती मिळत नव्हती. मात्र, या दौऱ्यामुळे ते सर्व प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
आधुनिक शेती व उद्योगांचा घेतला अनुभव -
या अभ्यास दौऱ्यात सहभागी माजी माओवाद्यांनी आधुनिक शेती पद्धती, सौरऊर्जेवर आधारित सिंचन व्यवस्था, ठिबक सिंचन तंत्रज्ञान तसेच राज्यातील औद्योगिक विकासाची प्रत्यक्ष पाहणी केली. या अनुभवातून विकासाच्या मुख्य प्रवाहातील संधी आणि बदलते ग्रामीण-औद्योगिक चित्र समजून घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिसांनी आयोजित केलेला हा उपक्रम आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला अधिक बळ देणारा ठरला असून, समाजाशी संवाद, विकासाची जाणीव आणि नव्या आयुष्याची सकारात्मक दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




