अडपल्लीत हत्तींचा धुडगूस : २१० पोते धानाचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा मुख्यालयालगतच्या वैनगंगा नदी परिसरात जंगली हत्तींचा धुडगूस सुरूच असून, रविवारी मध्यरात्री अडपल्ली येथे हत्तींच्या कळपाने शेतात घुसून तब्बल २१० पोते धानाची नासधूस केली. या घटनेमुळे शेतकरी केवळराम सालोटकर यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळराम सालोटकर यांची शेती वैनगंगा नदीकाठावर असून त्यांनी सात एकर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड केली होती. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून त्यांनी मेहनत घेऊन पिकाचे संगोपन केले. नुकतीच धानाची कापणी आणि मळणीची कामे पूर्ण झाली होती. विक्रीसाठी तयार ठेवलेले २१० पोते धान शेतात साठवून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री अचानक जंगली हत्तींच्या कळपाने शेतात प्रवेश केला. हत्तींनी धानाच्या पोत्यांवर तुडवून मोठी नासधूस केली. अनेक पोती फाटल्याने धान्य शेतभर विखुरले गेले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जंगली हत्तींच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या रानटी हत्तींच्या कळपाचा संचार पाल नदी व वैनगंगा नदी संगम परिसरात सुरू असून, नागरिकांनी या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




