चिमुकल्यांनी जपली पंढरीच्या वारीची परंपरा : शिवाजी इंग्लिश अकॅडेमीत भक्तिमय वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वारकरी संप्रदायाची परंपरा, संस्कृती आणि भक्तिभाव बालमनात रुजावा, या उद्देशाने शिवाजी इंग्लिश अकॅडेमी स्कूल, गडचिरोली येथे पंढरीची वारी हा सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभाग घेत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेपासून काही अंतरापर्यंत काढण्यात आलेल्या भक्तिमय रॅलीने झाली. चिमुकल्या वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात टाळ, भगवे पताके आणि पारंपरिक वेश परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा-तुकाराम पांडुरंग हरी अशा जयघोषांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि आकर्षक रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने रिंगण साकारत वारीची आरती केली. विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणाने परिसर मंगलमय झाला. फुगड्या, हरिनामाचा गजर तसेच वारकरी परंपरेचे प्रतीक असलेल्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव आल्याची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण. निरागस अभिनय, आकर्षक वेशभूषा आणि भक्तिभावाने ओतप्रोत सादरीकरणामुळे पालक, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी वाकुडकर, उपमुख्याध्यापिका संगीता खुणे आणि पर्यवेक्षक अरविंद बळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांची शिकवण आणि भक्ती, समता व संस्कारांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्यात आले. बालवयातच संस्कृतीची ओळख करून देणारा हा उपक्रम पालक आणि नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.
News - Gadchiroli




Petrol Price




