५ दिवसांत हायटेंशन पॉवर केबल चोरीचा पर्दाफाश : धाबा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली परिसरातून चोरीस गेलेल्या तब्बल २३ लाख ८८ हजार रुपयांच्या हायटेंशन पॉवर केबल चोरी प्रकरणाचा अवघ्या पाच दिवसांत छडा लावत धाबा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमाल, वाहने व मोबाईलसह एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राकेश जागेश्वर भोयर (३४) रा. खरबी नागपूर, ज्योतीष प्रभू प्रसाद (३९) रा. पारडी नागपूर, अभिनयकुमार रामलक्षण प्रसाद (२९) रा. परसोडी नागपूर, हरिप्रसाद श्यामजी उईके (३४) रा. परसोडी नागपूर, दिपक चेकर उईके (२७) रा. इंदिरा नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी समीर रमेश डिवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची कंपनी एमएसईडीसीएलच्या नव्या विद्युत लाईन प्रकल्पाचे काम करीत असून गोजोली-सुकवासी फाटा जंगल परिसरात १९/३३ KV HT Power Cable चे दोन ड्रम ठेवण्यात आले होते. ११ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे केबल ड्रम चोरी करून नेले होते. याप्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात अप. क्र. ४०/२६ कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपींचा शोध घेतला. आरोपी राकेश जागेश्वर भीमर, ज्योतिष प्रभूप्रसाद, अभिनयकुमार रामलक्षण प्रसाद, हरिप्रसाद श्यामजी उईके आणि दिपक उईके यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून चोरीस गेलेले १९/३३ KV HT Power Cable चे दोन ड्रम, एक हायड्रा क्रेन, दोन आयशर वाहने, एक होंडा सिटी कार तसेच विविध मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुबोध वंजारी, पोअं श्रावण कुत्तरमारे, प्यारेलाल देव्हारे, गजानन तूरेकर, रामेश्वर पाल यांनी केले.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास धाबा पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




