महत्वाच्या बातम्या

 लाडबोरीच्या मातीत गुलाल उधळत वर्षा वाघमारेचा शाही सत्कार : सावित्रीच्या लेकीचा गगनभरारी प्रवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : लेक शिकली, प्रगती झाली हे वाक्य फक्त ब्रीदवाक्य नाही, तर त्याचे प्रत्यक्षात झालेले दर्शन लाडबोरी गावात पाहायला मिळाले. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मेहनत आणि चिकाटीने शासकीय नोकरीच्या शिखरापर्यंत मजल मारली आहे. महाजनकोमध्ये टेक्निशियन-३ या पदावर नियुक्ती मिळाल्याने वर्षा वाघमारेने गावाचे नाव सुवर्णअक्षरात कोरले आहे.

यशस्वी वर्षाच्या सन्मानार्थ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीने २ मे रोजी शाळेच्या प्रांगणात विशेष सत्कार सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमात गावातील अनेक यशस्वी महिला उपस्थित होत्या आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश दिले.

सत्कार सोहळ्यात अध्यक्षीय भूमिकेत एकता नागदेवते होत्या. त्या दोन वर्षांपूर्वी सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून शासकीय सेवेत नियुक्त झाल्या होत्या आणि सध्या पंचायत समिती अकोला मध्ये कार्यरत आहेत. विशेष अतिथी म्हणून सुषमा खाडे उपस्थित होत्या, ज्या कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातून यशाचे शिखर गाठून सध्या सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य रुपाली चहांदे, राखी कारमेंगे, प्रतिभा दडमल, अश्विनी नागदेवते आणि वर्षा नन्नावरे यांचाही कार्यक्रमात विशेष सहभाग होता. अध्यक्षीय स्थान एकता नागदेवते यांच्याकडे तर विशेष अतिथींचे स्थान सुषमा खाडे यांच्याकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संपूर्ण महिला सदस्य मंचावर विराजमान होत्या.

मान्यवरांचे मार्गदर्शन -
एकता नागदेवते यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शासकीय नोकरी मिळवणे आजच्या काळात सोपे नाही. त्यासाठी घाम गाळून केलेला अभ्यास भविष्यात यशाचे फळ देतो. सुषमा खाडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, यश काही एका रात्रीत मिळत नाही; सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि थांबायचे नाही. त्यांनी वर्षाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याचे संचालन केंद्रप्रमुख व शिक्षिका राजश्री वसाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वनिता ठाकरे यांनी मानले. मुख्याध्यापक घनश्याम मंदाळे यांचे सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महत्वाचे ठरले. शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने या सोहळ्याला वेगळीच रंगत आली.

लाडबोरी गावाने वर्षा वाघमारेच्या यशस्वी प्रवासाचा सन्मान करत गावाच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी संदेश दिला, ज्यामुळे लेक शिकली, प्रगती झाली या घोषवाक्याला खरी दिशा मिळाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos