एप्रिलमध्ये चंद्रपूरची हवा मध्यमच : ३० पैकी २६ दिवस प्रदूषण

- उष्णता, धुळीकण व कचरा ज्वलनाचा परिणाम; आरोग्यावर धोका वाढला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) एप्रिल महिन्यात चिंताजनक पातळीवर राहिल्याचे समोर आले आहे. ३० दिवसांपैकी तब्बल २६ दिवस मध्यम (Moderate) श्रेणीत प्रदूषण नोंदविण्यात आले, तर केवळ ४ दिवस समाधानकारक (Satisfactory) राहिले. चांगला (Good) निर्देशांकाचा एकही दिवस आढळला नाही, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.
पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये उष्णतेची तीव्रता वाढल्याने तसेच वाहतूक, वाहनांमधून निघणारा धूर, कचरा ज्वलन आणि बायोमास बर्निंगमुळे धुळीकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले.
खुटाळा परिसरातही परिस्थिती गंभीर असून, बहुतांश दिवस प्रदूषण ‘मध्यम’ असतानाच २ दिवस अत्यंत प्रदूषित स्थिती नोंदली गेली. विशेष म्हणजे, ओझोन प्रदूषणात वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रबर व प्लास्टिक वस्तूंवरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
AQI विश्लेषण -
०–५० (चांगला) : एकही दिवस नाही
५१–१०० (समाधानकारक) : ४ दिवस
१०१–२०० (मध्यम) : २६ दिवस
२०१ पेक्षा जास्त (खराब/अतिखराब/धोकादायक) : एकही दिवस नाही
हवा गुणवत्ता निर्देशांक ठरविताना धुळीकण (PM१०, PM२.५), ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया आणि लीड या प्रदूषकांचा विचार केला जातो. यामध्ये एप्रिल महिन्यात PM१० धुळीकण सर्वाधिक २६ दिवस आढळले, तर PM२.५ व ओझोनचे प्रमाणही काही दिवस वाढले होते. यावरून धूळ, वाहनांचा धूर आणि कचरा ज्वलन हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते.
प्रदूषणाची कारणे वाढली -
शहरातील थर्मल पॉवर प्लांट, औद्योगिक उत्सर्जन, घरगुती कोळसा ज्वलन, वाढती वाहनसंख्या, रस्त्यांवरील धूळ, बांधकामे आणि कचरा जाळण्याच्या घटनांमुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. विकासकामांसोबतच वाहनांची वाढती संख्या हीसुद्धा प्रमुख कारणे ठरत आहेत.
आरोग्यावर गंभीर परिणाम -
प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका असून दमा, ब्रॉंकायटिस, क्षयरोग (टीबी), हृदयविकार आणि मानसिक तणाव यांसारख्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते. आधीपासून श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांसाठी ही स्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
उपाययोजनांची गरज -
प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षसंवर्धन, सायकल व सार्वजनिक वाहतुकीचा वापर, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन, कचरा ज्वलनावर बंदी आणि औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण आवश्यक आहे. स्मॉग टॉवर, फॉग मशीन आणि कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय असले तरी प्रशासनाने कठोर धोरणे राबविल्यासच प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, एप्रिल–मे महिन्यात ओझोन प्रदूषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




