नाशिक शहरात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक :
शहरात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यात मात्र कोणतीही संचारबंदी नसणार आहे. नाशिक शहरात झपाट्यानं रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. तसेच मास्क न वापरल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना सांगितलं की, "नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 5 दिवसांत 534 रुग्ण वाढले असून त्यातील 410 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. अत्यंत कडक नियम आम्ही घेऊ इच्छित नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क नाही वापरला तर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. पोलीस आणि महापालिका ही कारवाई करणार आहे. तसेच नियम न पाळणाऱ्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात येणार आहे. तसेच उद्यापासून रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू करण्यात येत आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "लग्नसमारंभात होणारी गर्दी कोरोनाच्या प्रादुर्भावास मुख्य कारण ठरते. मंडप आणि लॉन्सवाल्यांना मी आवाहन करतो की, गोरज मुहूर्तावरील लग्न बंद करा."
"नाशिक जिल्ह्यात साधरणपणे 69 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचं ठरवण्यात आलं होतं. 69 हजार पैकी 40 हजार जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. आमच्याकडे त्या लसींचा साठा आहे, आमची सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लस घ्या." , असंही छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.
  Print


News - Rajy | Posted : 2021-02-21


Related Photos