महत्वाच्या बातम्या

 कर्णबधिर चिमुकल्यांचा आवाज बंद


- पीएमजेएवाय चा डिजिटल फास : योजनेच्या एकत्रीकरणात कॉक्लिअर इम्प्लांट चा निधीच गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आरोग्यसेवेचे सुलभीकरण करण्याच्या नावाखाली राबविण्यात आलेले महात्मा फुले जन आरोग्य योजना (पीएमजेवाय) आणि आयुष्मान भारत चे एकत्रीकरण गरिबांच्या जीवावर उठले आहे. धोरणकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे जन्मतः कर्णबधिर असलेल्या बालकांसाठी वरदान ठरणारी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियाच आता बंद पडली आहे.नव्या पॅकेजमध्ये इम्प्लांटच्या खर्चाचा समावेशच नसल्याने मेयो आणि मेडिकलमधील ५० हून अधिक बालकांचे बोलणे आणि ऐकणे तांत्रिक फाईलमध्ये अडकले आहे.


पूर्वी पीएमजेएवाय अंतर्गत कॉक्लिअर इम्प्लांट आणि शस्त्रक्रियेसाठी ५.५ लाख रुपयांचे कवच होते. मात्र, २६ फेब्रुवारी २०२६ पासून लागू झालेल्या नव्या योजनेत हा दर थेट १.६२ लाखांवर आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यात प्रत्यक्ष इम्प्लांट च्या खरेदीचा खर्चच समाविष्ट नाही.

परिणामी, शासकीय रुग्णालयांनी इम्प्लांट खरेदी थांबवली असून मागील दोन महिन्यांपासून एकही शस्त्रक्रिया झालेली नसल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी मेडिकलमध्ये १५०, तर मेयोने १२५ कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करून जन्मजात कर्णबधिर मुलांना नवे जीवन दिले होते. परंतु आता नवीन रुग्णांसाठी हे उपचार दुरापास्त झाले आहे.

डायलिसिस रुग्ण मृत्यूच्या दारात परमॅकॅथ हे डायलिसिससाठी वापरले जाणारे एक विशेष प्रकारचे कॅथेटर (लवचिक नळी) आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या रुग्णांच्या किडनीचे कार्य थांबले आहे, त्यांच्या रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी शरीरात बसवलेला हा एक कृत्रिम मार्ग आहे. पूर्वी या प्रक्रियेसाठी १ लाख ४० हजार रुपयांचे पॅकेज होते. आता नव्या योजनेत या प्रक्रियेचे पॅकेज ३० हजारांवर आणले आहे. इतक्या कमी दरात दर्जेदार साहित्य वापरणे डॉक्टरांसाठी आव्हान ठरत आहे. पैशांअभावी डायलिसिसचे रुग्ण मृत्यूच्या दारात उभे आहेत.


उपचार न घेताच परतत आहेत रुग्ण नव्या नियमानुसार, लाभार्थ्यांना योजनेतून उपचार घ्यायचे असल्यास आयुष्यमान कार्ड ची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मित्रांकडून हे कार्ड ४ ते ५ तासांत उपलब्ध होत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी प्रत्यक्षात हे कार्ड मिळण्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागत आहे. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या जवळपास ४० ते ५० टक्के रुग्णांकडे हे कार्ड राहत नाही.

त्यामुळे तातडीच्या शस्त्रक्रियाही रखडत असून, काही रुग्णांना उपचार न घेताच परतावे लागत आहे. हाडांच्या शस्त्रक्रियाही रखडल्या आहेत ऑर्थोपेडिक (अस्थिरोग) शस्त्रक्रियेत नेमका कोणता इम्प्लांट लागेल, हे अनेकदा शस्त्रक्रिया सुरू असताना ठरवावे लागते. मात्र, नियमानुसार प्री - आथोरायझेशन च्या वेळीच इम्प्लांटचा कोड देणे सक्तीचे करण्यात आल्याने डॉक्टर अडचणीत आले आहेत.

यामुळे हाडांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. नव्या प्रणालीतील तांत्रिक गुंतागुंतही डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos