कोरोना लसीकरणात महिला अव्वल तर भारत जगभरात तिसरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
जगातील बहुतांश देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झालेली आहे. भारतातही १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्यात आले. देशात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक पुरुष असल्याचे पाहायला मिळत असले, तरी कोरोनाची लस घेण्यात महिला अव्वल ठरल्या आहेत. आतापर्यंत कोरोनाची लस घेणाऱ्यांमध्ये ६३ टक्के महिला असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात रविवारपर्यंत ५५ लाखांहून अधिक जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. अवघ्या २१ दिवसांत ५० लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रमही भारताच्या नावावर झाला आहे. जागतिक स्तरावरील देशांचा विचार केल्यास कोरोना लसीकरणात भारताचा तिसरा क्रमांक असल्याची माहिती मिळाली आहे, असे सांगितले जाते.
केंद्र सरकारने विकसित केलेल्या को-विनवरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत देशात ५५ लाख ६२ हजार ६२१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. यापैकी ३५ लाख ४४ हजार ४५८ म्हणजेच ६३.२ टक्के महिला आहेत. तर, २० लाख ६१ हजार ७०६ म्हणजेच ३६.८ टक्के पुरुषांचा समावेश आहे. या सर्व महिला आरोग्य सेविका असल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य सेतु अँपमध्ये लसीकरणाशी निगडीत एक भाग जोडण्यात आला असून, येथे लाभार्थी क्रमांक समाविष्ट केल्यास तात्पुरते प्रमाणपत्र मिळू शकते. तसेच आपल्या क्षेत्रात कोरोना लसीकरण बुथ कुठे आहेत, आतापर्यंत तेथे किती जणांचे लसीकरण झाले, यांसारखी माहितीही आता आरोग्य सेतु अँपवर उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, देशातील कोरोना लसीकरण अभियानाच्या २४ व्या दिवशी ६० लाखाचा आकडा ओलांडला. सोमवारी एकाच दिवशी सुमारे ६ लाखांहून अधिक जणांना कोरोना लस देण्यात आली. सन २०२१ च्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आल्यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. अमेरिकेत पहिल्या २६ दिवसांत आणि ब्रिटनमध्ये पहिल्या ४६ दिवसांत ४० लाख जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
  Print


News - World | Posted : 2021-02-09


Related Photos