महत्वाच्या बातम्या

 केळवद तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गुरुवारी (१९) मध्यरात्री झालेल्या जोरदार वादळी आणि अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील गव्हाच्या कापणीला आलेल्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेनंतर चार दिवस उलटले तरी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी किंवा पंचनामे करण्यास यशस्वी झालेले नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

या पावसामुळे केळवद, रायबासा, बिडगाव, जटामखोरा, हत्तीसर्रा, कवठा, आष्टी, ढालगाव (खैरी), जलालखेडा, रामपुरी, पंढरी, नरसाळा, खापा (नरसाळा), जोगा, माळेगाव, खुर्सापार या शिवारातील गव्हाचे कापणीला आलेले पिके, भाजीपाला आणि संत्रा-मोसंबीच्या अंबिया बहारासह गावरान व कलमी आंबे गळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. महेंद्र वडकी यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे उभे पीक आडवे झाले असून, त्यांचे नुकसान स्पष्ट आहे.

वादळ आणि पावसामुळे काही शेतातील गव्हाचे पीक कापणीयोग्य राहिले नाही. काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी व मळणी केली तरी दाण्याचा दर्जा खालावला असून, ओलाव्यामुळे दाणे काळवंडल्यासारखे झाले आहेत. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी माहिती देण्यात आली, मात्र चार दिवस उलटूनही कोणत्याही शेतातील पिकांची पाहणी किंवा पंचनामे झालेले नाहीत, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्यास सांगितले असून, राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई त्वरित जाहीर करून बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काही शेतकऱ्यांनी गव्हाची उशिरा पेरणी केल्यामुळे शेतातील पीक हिरवे असून, ओब्यांमधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत; मात्र पावसामुळे ते भुईसपाट झाल्याने परिपक्व होऊ शकणार नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाची आधीच कापणी व मळणी केली असल्याने त्या पिकाचे नुकसान फारसे झालेले नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos