जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवून प्राधान्याने कामे पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर


- जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला सक्रीय सहभाग नोंदवून प्राधान्याने कामे पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केले.
आगामी जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध स्तरावरील जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २३ ते २५ मार्च या कालावधीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण हे २३ ते २५ मार्च या तीन दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर येथील नियोजन भवनात होत आहे. प्रशिक्षणात जिल्हा जनगणना अधिकारी, सर्व चार्ज जनगणना अधिकारी, शहर जनगणना अधिकारी, अतिरिक्त चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक सहभागी झाले आहेत.
कार्यशाळेत जनगणनेच्या कामात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची नेमकी कर्तव्यांची माहिती दिली जात आहे. घरांची यादी तयार करणे, घरांची गणना करणे आणि सीएमएमएस आणि एचएलबीसी पोर्टलचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे.
जणगणनेची कामे प्राधान्याने सर्वांनी पूर्ण करण्याची गरज आहे. यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण या तीन दिवसात दिले जाणार आहेत. सर्वांनी प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करीत जणननगेची संबंधित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जनगणना कार्य निदेशालय, महाराष्ट्र यांचे मार्फत सहसंचालक कविता गोडबोले, सहाय्यक संचालक प्रकाश जीभीनकर, जिल्हा समन्वयक प्रणय कडुकार, सौरभ सिंह यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त निर्भय जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते.
News - Nagpur




Petrol Price




