महत्वाच्या बातम्या

 सिक्कीममध्ये ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप : सौम्य धक्क्यांमुळे मोठे नुकसान नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / गंगटोक, सिक्कीम : ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य सिक्कीममध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. अचानक आलेल्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले, परंतु सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.

नेमके काय घडले?
सिक्कीममधील डोंगराळ भागात जमीन अचानक हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू आणि खोलीबाबत तपास सुरू असून, प्राथमिक माहितीनुसार हा धक्का सौम्य स्वरूपाचा होता. हिमालयीन पट्ट्यात अशा छोटे भूकंप होणे ही सामान्य बाब आहे. तरीही स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.

सिक्कीममध्ये भूकंप का येतात? -
सिक्कीममध्ये भूकंप येण्यामागे भौगोलिक कारणे महत्त्वाची आहेत. पृथ्वी अनेक मोठ्या प्लेट्सवर आधारलेली आहे आणि सिक्कीम अशी जागा आहे जिथे इंडियन प्लेट आणि ‘युरेशियन प्लेट’ एकमेकांना धडकतात. या टक्करीमुळे करोडो वर्षांपूर्वी हिमालय तयार झाला आणि ही प्रक्रिया आजही चालू असल्यामुळे भूगर्भात सतत हलचाल होत असते.

सिक्कीम हा हिमालयाच्या कुशीत वसलेला भाग असून अजून पूर्णपणे स्थिर नाही. त्यामुळे जमिनीखालील हालचालींचे प्रमाण जास्त असून, भूकंपाच्या दृष्टीने हे राज्य देशातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक मानले जाते. सिक्कीम सिस्मिक झोन ४ आणि ५ मध्ये येतो, जिथे झोन ५ सर्वात धोकादायक आहे.

सावधानतेसाठी प्रशासनाचे आवाहन -
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्यामुळे जमीन आधीच कमकुवत आहे. अशा परिस्थितीत भूकंपाचे धक्के नागरिकांसाठी चिंतेचे कारण ठरतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सौम्य धक्क्यांमुळे मोठा धोका नाही, तरी नागरिकांनी सतर्क राहणे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. प्रशासनानेही स्पष्ट केले आहे की सध्या सिक्कीममधील जनजीवन पूर्वपदावर आहे आणि भीतीचे कोणतेही कारण नाही.





  Print






News - World




Related Photos