आरमोरीत कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांची धाड : एक आरोपी अटकेत, तिघे फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : अवैध कोंबड्यांच्या झुंजीवर आरमोरी पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली असून तिघे जण फरार झाले आहेत. कारवाईदरम्यान सुमारे ३ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ६ मार्च रोजी दुपारी १२.३० ते १.२५ वाजताच्या दरम्यान पालोरा-कन्हेरी मार्गावरील आशिष निंबेकर यांच्या विटा भट्टीजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप नामदेवराव मोहर्ले (५७), पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन आरमोरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष छापा टाकला असता तेथे कोंबड्यांच्या झुंजीच्या जुगाराचा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणात प्रितमकुमार जगन्नाथ जांभुळे (४९, रा. आझाद चौक, आरमोरी) याला अटक करण्यात आली आहे. तर स्वप्निल तितीरमारे, कमलेश गोवर्धन आणि मनोज गोंधळे हे तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख रक्कम, कोंबड्यांच्या झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी धारदार कात्या, एक जिवंत कोंबडा तसेच नऊ मोटार वाहने असा एकूण ३ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच झुंजीदरम्यान जखमी होऊन मृत्यू झालेल्या तीन कोंबड्यांना पंचांसमक्ष जमिनीत पुरण्यात आले.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ), (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




