साक्ष दिल्याच्या रागातून सराफा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला : दोन भावांविरुद्ध पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पूर्वीच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून एका सराफा व्यावसायिकावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव चंद्रया मातंगी (वय ५८), रा. साई अपार्टमेंट, डॉ. कल्लुरवार हॉस्पिटल मागे, बल्लारपूर हे गांधी चौक परिसरात अनुराग ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दुकान चालवितात. त्यांच्या दुकानाजवळच सुरज संतोष गुप्ता याचे पान मटेरियलचे दुकान आहे. यापूर्वी अभिषेक मालू यांच्या दुकानावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याच्या प्रकरणात मातंगी हे साक्षीदार होते. त्याचा राग मनात धरून सुरज गुप्ता याने पूर्वीही त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, ६ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास आनंदराव मातंगी हे दुकान बंद करून घरी जात असताना सुरज गुप्ता यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या चंदन गहेरवार यांच्याशी बोलत असताना सुरज संतोष गुप्ता व त्याचा भाऊ बंटी उर्फ निरज संतोष गुप्ता यांनी शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर दोघांनीही मातंगी यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. यावेळी सुरज गुप्ता याने हातातील कड्याने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ व नाकावर प्रहार केल्याने ते जखमी झाले.
या झटापटीदरम्यान मातंगी यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम व २५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन तसेच बालाजी लॉकेट असलेली चैन हरवून त्यांचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा अनुराग व भाचा आशिष कोमटी घटनास्थळी आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून बंदुकीने उडवून टाकण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सुरज संतोष गुप्ता व बंटी उर्फ निरज संतोष गुप्ता यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), २९६, ३(५) व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




