गडचिरोलीत अवैध दारूवर मोठी कारवाई : १२.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त


- चारचाकीसह विदेशी मद्याचा साठा जप्त
- मुख्य आरोपी फरार, शोधमोहीम सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करून चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करण्याचा प्रयत्न उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपी फरार झाला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने रविवारी १ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अजय चिचघरे (रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली) हा आपल्या साथीदारांसह चारचाकी वाहन क्र. यूपी १६ डीबी ०५९० द्वारे पोमके-पोटेगाव हद्दीत विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.
माहितीच्या आधारे पथकाने मौजा नवरगाव येथे दोन पंचांसह सापळा रचला. शामराव अलीवार यांच्या घरासमोर संशयित वाहन दिसताच पोलिसांनी अडवण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून दोन इसमांसह अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य आढळून आले. त्यात रॉयल स्टॅग डिलक्स कंपनीच्या १८० एमएल क्षमतेच्या १,०५६ काचेच्या बाटल्या (अंदाजे किंमत ३ लाख १६ हजार ८०० रुपये), ९० एमएलच्या १०० बाटल्या (१५,००० रुपये), १ लिटरच्या २३ बाटल्या (४६,००० रुपये), तसेच हायवर्ड ५००० प्रीमियम स्ट्रॉंग बिअरच्या ५०० एमएलच्या १४४ टिन (४३,२०० रुपये) असा मद्यसाठा आढळला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी (अंदाजे किंमत ८ लाख रुपये) जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १२ लाख २१ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (अ), ८३, ९८ (२) अन्वये अजय चिचघरे (रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा किंकर (पोमके-पोटेगाव) करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि समाधान दौड, पोअं रोहित गोंगले, पोअं प्रशांत गरफडे व चापोअं रामदास उईनवार यांनी पार पाडली.
News - Gadchiroli




Petrol Price




