गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के : तेलंगणा सीमेजवळील भागात भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग आणि तेलंगणा सीमेला लागून असलेल्या क्षेत्रात बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री ११:५१ ते ११:५९ च्या सुमारास आलापल्ली, सिरोंचा आणि अहेरी परिसरात जमिनीला कंप जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीती पसरली. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदवली गेली असून, त्याचे केंद्र तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्ह्यातील रामगुंडमपासून ३५ किलोमीटर अंतरावर होते.
गेल्या पाच वर्षांत या भागात भूकंपाचे पाचवे धक्के असून, ते वारंवार होण्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी ५.३ रिश्टर स्केलचा मोठा धक्का तेलंगणातील मुलुगू येथे अनुभवला गेला होता.
भूकंप प्रवण क्षेत्रात असलेला गडचिरोली जिल्हा -
गडचिरोली जिल्हा कोळशाच्या खाणी आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो. याठिकाणी बारंबार होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींमुळे जागतिक पातळीवर तज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः, गोदावरी खोऱ्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये समाविष्ट होतो, तसेच येथे असलेल्या कोळशाच्या खाणी आणि मेडीगड्डा सारख्या मोठ्या धरण प्रकल्पांमुळे भूगर्भातील नैसर्गिक संरचनेला धक्का बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
त्याचप्रमाणे, तेलंगणा राज्यातील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेअंतर्गत मेडीगड्डा धरणाच्या बांधकामामुळे भूगर्भातील दाबावर परिणाम झाल्याचे चर्चा चालू आहे.
भविष्यातील धोक्याचे संकेत -
रामगुंडम परिसरातील खाणकामाचा विस्तार आणि भौगोलिक बदल यामुळे भूकंपाची वारंवारता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ५ वर्षांच्या आढाव्यात गडचिरोलीच्या दक्षिण भागाला पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्यात उमानूर, जाफ्राबाद आणि महागांव हे केंद्रबिंदू होते.
आता केंद्रबिंदू तेलंगणा राज्यात सरकत असून, त्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केलपर्यंत पोहोचल्याने भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा परिसर आधीच संवेदनशील क्षेत्रात येतो, आणि कोळशाच्या खाणींमधील हालचाली तसेच मोठ्या धरणांमधील पाण्याचा साठा यामुळे भूगर्भातील प्लेट्सवर ताण निर्माण होत आहे, ज्यामुळे आगामी काळात भूकंपाच्या धक्क्यांची वारंवारता अधिक होऊ शकते.
नागरिकांची चिंता आणि प्रशासनाची सजगता -
मध्यरात्री झालेल्या भूकंपाने गडचिरोली आणि तेलंगणा सीमेजवळील नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. प्रशासन आणि तज्ज्ञांद्वारे या घटनांची बारकाईने पाहणी केली जात आहे, आणि भविष्यातील भूकंपांच्या धक्क्यांपासून सुरक्षा उपाय योजण्यासाठी तयारी सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




