कॅन्सरवर उपचारापेक्षा कॅन्सर होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे : खासदार अमर काळे


- समुद्रपूर तालुक्यात भारतातील पहिले सर्वायकल कॅन्सर संरक्षित गावे घोषित
- लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जगात अनेक प्रकारचे कॅन्सर आहे. या आजारावर कायमस्वरुपी उपचार नाही. यापैकीच एक असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरपासून महिलांना वाचविण्यासाठी लसीकरण हा उपचार आहे. कॅन्सरवर उपचार होण्यापेक्षा कॅन्सर होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी या कॅन्सरपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी केले.
महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण व त्या आजाराचे गांभिर्य व परिणाम लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅनकाईंड फार्मा व स्वास्थ वृक्ष फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच खासदार अमर काळे यांच्या पुढाकाराने समुद्रपूर तालुक्यातील १२ गावात कॅन्सरमुक्त लसीकरण अभियान राबविण्यात आले.
अभियानांतर्गत तालुक्यातील किन्ही, कवठा, निंभा, आरंभा, करुड, पवनगाव व नारायणपूर या सात गावात शंभर टक्के लसीकरण करुन ही गावे संपुर्णत: कॅन्सरमुक्त करण्यात आले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे या गावातील सरपंच, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी व स्वास्थ वृक्ष फाऊंडेशनचे स्वयंसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा.काळे बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्पप्नील बेले, मॅनकाईंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल अरोरा, कंपनी दायित्व निधीचे महाव्यवस्थापक अखिलेश डीमरी, स्वास्थ वृक्ष फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ.दिपीका चांढोक, उपाध्यक्ष अभिषेक चावला, इंद्रेश चव्हाण, अलोक पांडे आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ७ गावे देशातील पहिली कॅन्सरमुक्त गावे करण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, गावांचे सरपंच व नागरिकांनी आलेल्या विविध अडचणींवर मात करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केल्याबाबत खासदार अमर काळे यांनी आभार मानले तसेच पुढील टप्प्यात संपूर्ण समुद्रपूर तालुका कॅन्सरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या या जिल्ह्यात महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित असलेल्या मॅनकाईंड कंपनीने सॅनेटरी पॅड उत्पादन उद्योग सुरु करावा जेणेकरुन येथील महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊन महिला आत्मनिर्भय होण्यास मदत होईल, असेही काळे म्हणाले.
कॅन्सर हा भयंकर आजार आहे. यावर उपचार नसला तरी गर्भाशयाच्या कॅन्सरवर लसीकरण हाच उपचार आहे. यासाठी स्वास्थ वृक्ष फाऊंडेशनने संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण करावे, यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतपरी मदत करण्यात येईल. आरोग्य विभागाच्यावतीने लवकरच या आजारावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.
दहा कुटूंबामागील एका कुटूंबातील महिला कॅन्सर आजाराने पिडीत असून या आजाराने मृत्युच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी महिलांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मानव सेवेचे कार्य स्वास्थ वृक्ष फाऊंडेशनच्यावतीने होत आहे. ही एक अभिमानाची बाब आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले.
शितल अरोरा आणि अखिलेश डिमरी यांनी सामाजिक दायित्व निधीतून उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करत, अशा प्रभावी आरोग्य उपक्रमांसाठी पुढील काळातही आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. यावेळी सुधीर पांगुळ, डॉ.स्वप्नील बेले यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
समुद्रपूर तालुक्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला असून स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशनच्या कॅन्सर कवच या प्रमुख उपक्रमांतर्गत आणि मॅनकाईंड फार्माच्या दायित्व निधीच्या सहकार्याने भारतातील पहिले सर्वायकल कॅन्सर संरक्षित गावे घोषित करण्यात आली आहेत.
या उपक्रमांतर्गत ९ ते २६ वयोगटातील सर्व पात्र मुलींना सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीकरण पूर्ण करण्यात आले. हा उपक्रम समुद्रपूर तालुक्यातील १७ गावांमध्ये राबविण्यात आला. त्यापैकी ७ गावांमध्ये १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाल्याने त्या गावांना अधिकृतपणे सर्वायकल कॅन्सर संरक्षित गावे म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते सरपंच, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, गाव, तालुका आणि जिल्हास्तरावरील स्वयंसेवक, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा तसेच ऑपरेशन डायरेक्टर हेमचंद्र सलोडकर, ॲडमिन मॅनेजर अंकुश बिजेवार, एसव्हीएफ युवा अध्यक्ष साक्षी बोरकर, एसव्हीएफचे सर्व स्वयंसेवक आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
News - Wardha




Petrol Price




