भरधाव टिप्परची एसटी बसला धडक : अपघातात दोघे जखमी, टिप्पर चालक फरार, बस शेतात घुसली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील बोन्ड गावाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बस आणि टिप्परची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक महिला व एक पुरुष जखमी झाले. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून नागभीड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नागभीड आगाराची एसटी बस क्रमांक एमएच ०७ सी ९३७३ ही बाळापूर मार्गावर प्रवासी घेऊन जात होती. सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास बोन्ड येथील बसस्थानकासमोर नागभीडकडून येणाऱ्या भरधाव टिप्पर क्रमांक एमएच ३६ एए ४३५८ ने बसला जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, धडकेनंतर बस थेट रस्त्यालगतच्या शेतात जाऊन घुसली. बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष जखमी झाले असून त्यांना प्राथमिक मदतीनंतर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करण्यात आला असून टिप्पर चालक अपघातानंतर वाहन जागेवरच सोडून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




