पेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक २०१८ या स्पर्धेचा अंतीम सामना पेंढरी उपविभाग संघाने जिंकला आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तब्बल १० हजार ३९२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
काल १६ आॅक्टोबर रोजी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत ३० सेकंदात पेंढरी उपविभाग संघाने धानोरा संघावर अवघ्या एका गुणाची आघाडी मिळवत विजय मिळविला. मनोवेधक आणि चित्तथरारक सामना पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी, अपर पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रकल्प अधिकारी सचिन ओम्बासे, अहेरीचे प्रकल्प अधिकारी इंदु गर्ग, सिआरपीएफचे उपकमांडंट सपन सुमन, प्रो. कबड्डी लिग खेळाडू शशांक वानखेडे यांच्यासह प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पोलिस संकुल येथील दुर्गा माता महिला संघाने गरबा नृत्य सादर केले. महेंद्र आलामी गृप एटापल्ली येथील आदिवासी बांधवांनी मनोवेधक असे रेला नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यानंतर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या उपविभाग पेंढरी संघाला २५ हजार रूपये रोख, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक सुवर्णपदक, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेत्या धानोरा संघास २० हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राखीव पोलिस निरीक्षक ठाकुर, सिव्हीक अॅक्शन सेलचे प्रभारी अधिकारी अतुल खंदारे, प्रपोगंडा शाखेचे प्रभारी अधिकारी अवधुत शिंगारे, कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पवार यांनी सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-17


Related Photos