महत्वाच्या बातम्या

 चाकणच्या मच्छीमार्केट परिसरात युवकाचा खून : शहरात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : चाकण शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी मच्छीमार्केटच्या समोरील गल्लीत एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी १४ दुपारी घडली. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रथमेश माने (रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मच्छीमार्केट परिसरात वर्दळ सुरू असतानाच अचानक हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, युवकाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चाकण उत्तर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात बिरदवडी (ता. खेड) येथे अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.





  Print






News - World




Related Photos