महत्वाच्या बातम्या

 नागपूर : अदानी समूहाच्या ७० हजार कोटींच्या प्रकल्पामुळे ३० हजार लोकांना रोजगार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे अदानी समूहाने एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज कॉम्प्लेक्स उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, यामुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आणि अदानी डिजिटल लॅब्सचे प्रमुख जीत अदानी यांनी याबाबत माहिती दिली.

प्रकल्पाचे महत्त्व -
जीत अदानी यांनी विश्वास व्यक्त केला की, या प्रकल्पामुळे नागपूरला स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर ठळक स्थान मिळेल आणि भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेला अधिक बळकटी मिळेल.

विदर्भातील ऊर्जा आणि पायाभूत सुविधा -
अदानी समूहाने विदर्भातील वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तिरोडा प्रकल्प मध्ये ३ हजार ३०० मेगावॉट क्षमतेचा अत्याधुनिक सुपरक्रिटिकल वीज प्रकल्प चालवला जात आहे, तसेच बुटीबोरी वीजप्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. अदानी समूह महाराष्ट्राला ६ हजार ६०० मेगावॉट वीजपुरवठा करत आहे, जो राज्यातील उद्योग आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.

लॉजिस्टिक्स आणि इतर प्रकल्प -
अदानी समूह विदर्भाला लॉजिस्टिक्स गेटवे म्हणून स्थापित करण्यासाठी काम करत आहे. मिहान येथील एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल) संकुल आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होत आहे. बोरखेडी आयसीडी केंद्र मालवाहतुकीचा खर्च कमी करत असून, निर्यात वाढविण्यास मदत करत आहे.

पर्यावरणीय जबाबदारी आणि वृक्षारोपण -
जीत अदानी यांनी गोंडखैरी येथील भूमिगत खाणीला गोल्ड स्टॅण्डर्ड असे संबोधले. येथे कोणतेही विस्थापन न करता तंत्रज्ञान आधारित खाणकाम केले जात आहे. २०३० पर्यंत १० कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यामध्ये विदर्भाची महत्त्वाची भूमिका असेल.

अदानी समूह विदर्भासाठी एक दीर्घकालीन भागीदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Nagpur




Related Photos