महत्वाच्या बातम्या

 शनिवार–रविवारी मुंबई–नागपूर मार्गावर विशेष रेल्वे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शनिवार आणि रविवारी मुंबई–नागपूर रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री मुंबईहून नागपूरकडे आणि रविवारी रात्री नागपूरहून मुंबईकडे विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे.

मुंबई–नागपूर–मुंबई या मार्गावर वर्षभर प्रवाशांची वर्दळ असते. विशेषतः मुंबईत नोकरी अथवा विविध कामानिमित्त वास्तव्यास असलेली विदर्भातील मोठी लोकसंख्या शनिवारी आपल्या गावी परतते, तर रविवारी रात्री पुन्हा मुंबईकडे प्रयाण करते. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवसांत या मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते.

अनेकदा गाड्यांमध्ये उभे राहायलाही जागा राहत नाही. परिणामी काही प्रवाशांना खासगी वाहने किंवा खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर दोन विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०२१३९ ही स्पेशल ट्रेन शनिवारी २४ जानेवारी रोजी मध्यरात्री ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटून रविवारी दुपारी ३.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०२१४० ही स्पेशल ट्रेन रविवारी २५ जानेवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दाखल होईल.

या दोन्ही विशेष गाड्या मार्गातील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांनाही या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.

या विशेष गाड्यांना एकूण २२ एलएचबी कोचेस असणार असून, त्यामध्ये १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे शनिवार–रविवारी होणारी प्रवासी गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, नागपूर–मुंबई मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos