पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी स्मार्ट तिकीट काढण्याची सुविधा


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत मोठे परिवर्तन घडवले आहे. विविध ॲप्लिकेशन्सद्वारे तिकीट काढण्याची सुविधा आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) आंतर-कार्यक्षमता प्रणाली कार्ड सुरू करून मेट्रोने प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि डिजिटल केला आहे. या सुविधेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
वन कार्ड, वन ट्रॅव्हल, वन नेशन या संकल्पनेतून पुणे मेट्रोने प्रवाशांना अत्याधुनिक आणि सुरक्षित सेवा उपलब्ध करून दिली आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) अंतर्गत क्यूआर तिकीट प्रणाली आणि एनसीएमसी प्रणाली कार्डाच्या मदतीने आता प्रवाशांना मेट्रो प्रवासासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध होणार आहेत. यासोबतच, सीसीटीव्ही व्हिडिओ ॲनालिटिक्स हॅकथॉनमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्हिडिओ ॲनालिटिक्स प्रणाली महत्त्वाची ठरली आहे. या प्रणालीच्या मदतीने प्लॅटफॉर्मवरील घडामोडींवर रिअल-टाईम मॉनिटरिंग होईल. यामुळे गर्दी, पडणे, झटापट आणि विसरलेली वस्तू यासारख्या घटनांवर त्वरित प्रतिक्रिया दिली जाऊ शकते.
अशा विविध डिजिटल सुविधांमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रवाशांची वेळ वाचेल आणि प्रवास अधिक आरामदायक होईल.
News - Rajy




Petrol Price




