राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला धडक : महिला प्रवासी ठार, ४० जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देवरी : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर देवरीजवळ धोबीसराळ गावाजवळ गुरुवार मध्यरात्री कांकेर ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने एका महिला प्रवासीचा जागीच मृत्यू झाला, तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ११ गंभीर जखमींना गोंदिया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान रस्त्यात मृत्यू झाला आहे.
प्रवासी चंद्रपूरकडे मजुरीसाठी जात होते -
घटना रात्रे १२ वाजेच्या सुमारास घडली. ट्रक इंधन संपल्यामुळे बंद अवस्थेत उभा होता. कवर्धा, छत्तीसगड येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कांकेर ट्रॅव्हल्सच्या बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले, त्यात महिला सुनीता हेमलाल बघेले (३५) हिचा जागीच मृत्यू झाला. सर्व जखमी प्रवासी मजूरीसाठी चंद्रपूर कडे जात होते आणि ते छत्तीसगडच्या कवर्धा व खैरागड येथील होते.
गंभीर जखमींना गोंदिया शासकीय रुग्णालयात दाखल -
घटनास्थळी तातडीने मदतीसाठी धोबीसराळ गावातील नागरिक व देवरी येथील हेल्पिंग ग्रूप धावले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले. ११ गंभीर जखमींना गोंदिया शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले, त्यात आठ जणांची स्थिती चिंताजनक आहे.
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गोंदिया येथून नागपूरकडे नेत असताना दोन जणांचा मृत्यू झाला.
सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीसाठी हात पुढे -
जखमींना मदतीसाठी देवरीतील हेल्पिंग ग्रूप आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून सकाळपर्यंत मदतीचा हात दिला. १०८ रुग्णवाहिकांचा उपयोग करून सर्व जखमींना वेळेत उपचारासाठी पाठविण्यात आले. दुर्घटनेची सविस्तर चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




