महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम मिळदापल्ली गावातील काजल मज्जी ची खेलो इंडियासाठी भुवनेश्वर येथे निवड


-  आशियाई, ऑलिम्पिक खेळासाठी पाच वर्ष घेणार क्रीडा प्रशिक्षण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
  तालुक्यातील अतिदुर्गम  अतिमागास, संवेदनशील परीसर, हिरव्यागर्द वनराईने  नटलेले नैसर्गिक सौंदर्य,  महाराष्ट्र व छत्तीसगडची सीमा दर्शवणारी इंद्रावती नदी आणि या नदीच्या किनाऱ्यावर  वसलेले मिळदापल्ली नावाचं छोटसं गाव. तालुका मुख्यालयापासून २७ कि.मी.चे अंतर.याच गावातील एक आदिवासी मुलगी "खेलो इंडिया" योजनेअंतर्गत भारतीय खेल प्राधिकरण, भुवनेश्वर (ओरिसा)येथे निवडली जाईल यावर विश्वास बसत नाही ना ! पण हे खरे आहे. काजल सोमा मज्जी हीची भारतीय खेल प्राधिकरण भुवनेश्वर (ओरिसा) येथे पाच वर्षाच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
 काजल सोमा मज्जी ही लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथे इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत होती. या शाळेत क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू घडविले जातात. स्पोर्ट ऑथॉरिटी आँफ इंडिया (साई) म्हणजे भारतीय खेल प्राधिकरणसाठी निवड चाचणी घेऊन  खेळाडू निवडण्याची प्रक्रिया असते. त्यामध्ये लोकबिरादरी आश्रम शाळेचे खेळाडू विद्यार्थी निवड चाचणीद्वारे दरवर्षी निवडले जातात. त्यानंतर त्यांना औरंगाबाद साईत प्रवेश मिळतो. काजल त्यातलीच एक ! २०१४-१५ मध्ये इयत्ता ६ वीत असतांना तिची औरंगाबाद साईत निवड झाली. क्रीडा मार्गदर्शिका सारिका गायकवाड व क्रीडा प्रशिक्षक सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनात 'लांब उडी' या वैयक्तिक खेळ प्रकारात तिने सरावाला सुरुवात केली. सकाळी ५.३० ते ९.३० क्रीडा सराव,१०ते १२.३० शाळा, दुपारी ३ ते ७.३० परत क्रीडा सराव, रात्री ८ते १० वाजेपर्यंत अभ्यास असा दिनक्रम सुरु झाला. याच दरम्यान काजल विविध क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायची. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, पुणे, वेस्टर्न झोन राष्ट्रीय स्पर्धा नागपूर, ज्युनिअर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुंटुर (तेलंगाना)ईत्यादी ठिकाणी लांब उडी खेळप्रकारात चमकदार कामगिरी करुन प्राविण्य मिळविले. तिच्यातील क्रीडा नैपुण्यामुळे बेंगलोर येथे दोन महिण्याच्या प्रशिक्षणासाठी संधी मिळाली, ते तिने पूर्ण केले. तद्नंतर दिल्लीत ऑगस्ट -२०१८ ला एक महिण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.याच दरम्यान तिची भुवनेश्वरला निवड झाली. काजलच्या या सर्व कामगिरीकरीता लोकबिरादरी प्रकल्पाने तिला वेळोवेळी आर्थिक मदत करुन प्रोत्साहन दिले.
 भारतीय खेल प्राधिकरण भुवनेश्वर येथे आशियाई क्रीडा स्पर्धा व आँलिंपिकसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले जातात. काजलची येथे ५ वर्षासाठी निवड झाली आहे. यादरम्यान ५ लाख रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाच वर्ष सराव करून आपण आशियाई व आँलिंपीक नक्कीच खेळणार असे तिचे स्वप्न आहे. ती २२ ऑक्टोबरला भुवनेश्वर येथे प्रवेश घेणार आहे.  जाण्यापूर्वी लोकबिरादरी आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यिंनी मित्र-मैत्रीणीं,शिक्षक,व आमटे परीवारास भेटायला काजल  आली होती. यावेळी समिक्षाताई आमटे यांचे हस्ते ५००० रुपये देऊन तिला गौरविण्यात आले. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून आपले अनुभव कथन केले. तिचा भाऊ रमेश मज्जी उपस्थित होता. काजलच्या निवडीबद्दल लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे,लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षाताई आमटे, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरिफ शेख, शाळेतील शिक्षक व प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी काजलचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-16


Related Photos