पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


-  जिल्हा कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा
-  कायद्याचे राज्य निर्माण करावे
-  जिल्ह्याचे गुन्हा सिद्धीचे प्रमाण वाढले
- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस वसाहतींना मान्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलडाणा  :
राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. या जबाबदारीचे भान ठेऊन पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण करावा. सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री मदन येरावार, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ आदी उपस्थित होते.
पोलिसांनी गुन्हेगारी सिद्धतेमध्ये येत असलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांवर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. तपासात गुणवत्ता वाढविण्यात यावी. राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तपास करावा. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयातील सरकारी अधिवक्त्याचा सल्ला घ्यावा. तसेच अवैधधंद्यांवर कडक कारवाई करावी. महिलांविरुध्दच्या गुन्ह्यांचा तपास काळजीपूर्वक करावा.
गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार आणि तक्रारदार फितूर होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. फितूर झाल्यास संबंधितावर धोखाधडीचा गुन्हा दाखल करावा. तसेच न्यायालयात अर्ज दाखल करावा, निवाड्याच्या वेळी या अर्जाचा उल्लेख करण्याची विनंती करावी. चोरीच्या प्रकरणांमध्ये तपास लागत नाही, असा नागरिकांचा समज आहे, तो दूर करावा. बुलडाणा येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय सुमारे शंभर वर्षे जुने आहे. या कार्यालयाच्या इमारती सोबतच पोलिसांसाठी बुलडाणा येथे १२५ घरे प्राधान्याने बांधण्यात येतील. गुन्हे सिद्धतेचे जिल्ह्याचे प्रमाण चांगले आहे. ते आणखी वाढविण्यात यावे.
बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी सादरीकरण केले. यावेळी पोलीस स्टेशननिहाय विविध गुन्हे प्रकारांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक,  उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस निरीक्षक, सरकारी वकील आदी उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2018-10-16


Related Photos