कोट्यात नीट विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला : पोलिसांचा तपास सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कोटा : नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह शनिवारी वसतिगृहात आढळल्याने खळबळ उडाली. रोशनकुमार पात्रो (रा. अभयपूर, जिल्हा गंजाम, ओडिशा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो राजीव गांधी नगर येथील एका हॉस्टेलमध्ये राहत होता.
रोशन नीट परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी कोटा येथे आला होता. शनिवारी दुपारी तो जेवणासाठी न आल्याने त्याचा चुलतभाऊ, जो त्याच वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावर राहतो, त्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोनला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने ही माहिती हॉस्टेल वार्डनला दिली. वार्डनने स्पेअर किल्लीद्वारे दरवाजा उघडला असता रोशन पलंगावर निपचित अवस्थेत आढळला.
घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासात विद्यार्थ्याने उलटी केल्याचे समोर आले असून, तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे जप्त केले आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
रोशन शिक्षणासाठी कोटा येथे आला पण -
नीटच्या तयारीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरलेले कोटा पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या मृत्यूने हादरले आहे. यंदाच रोशन कोटा येथे दाखल झाला होता. स्वप्नपूर्तीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या या तरुणाचे असे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
News - World




Petrol Price




