महत्वाच्या बातम्या

 शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिट करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, सरकारी किंवा खाजगी उद्योग, सहकारी संस्था व कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना गळीतधान्य उत्पादनाला सुरक्षित साठवणूकीची सुविधा मिळावी तसेच मालाचे योग्य व्यवस्थापन होऊन मुल्यवर्धन करता यावे, यासाठी केंद्र शासनाच्या विशेष अभियानांतर्गत गोदाम बांधकामाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

योजनेंतर्गत २५० मेट्रीक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी जे कमी  असेल अशा प्रकल्पाकरीता शेतकरी उत्पादक संस्था, सरकारी किंवा खाजगी उद्योग, सहकारी संस्था व कंपन्यांना गोदाम बांधकामाकरीता अनुदान  देण्यात येणार आहे. यासाठी  इच्छुक पात्र संस्था, उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनी बँकेमार्फत प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

ही योजना आर्थिक वर्षानुसार राबविली जाणार असून संबंधित लाभार्थ्यांनी निर्धारित वेळेतच बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदाम बांधकाम सोतबच काढणी पश्चात पायाभूत सुविधा या बाबींतर्गत १० टन क्षमतचे तेल काढणी युनिट व तेलबिया प्रक्रिया यंत्रसामुग्रीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा ९ लाख ९० हजार जे कमी असेल ते इतके अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचे निकष व शर्ती : जमीन व इमारतीसाठी अनुदान दिले जाणार नाही. केवळ सयंत्र व यंत्रसामग्रीसाठी मर्यादीत राहील. सयंत्र खरेदी व प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरच अनुदान देय राहील. अनुदान लाभार्थ्यांच्या थेट आधार संलग्न बँक खात्यावर जमा होईल. लाभार्थ्यांना सीफेट, लुधियाना इत्यादी केंद्रशासित संस्थांनी प्रमाणित केलेली यंत्रसामग्री वापरावी. एकाच घटकातील दोन योजनेतून अनुदान घेता येणार नाही. बँकेकडून प्रकल्प मंजूर झाल्यानंतरच लाभार्थी योजनेस पात्र राहील, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलीनी भोयर यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos